पण म्हणजे करायचं काय?
डॉक्टर बेकी केनेडी म्हणून एक अमेरिकी मानसशास्त्रज्ञ आहेत. पालकांच्या विविध समस्यांचा त्यांनी भरपूर अभ्यास केला आहे. एका युट्युब पॉडकास्टमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे येणारे ९५ टक्के पालक, ‘तुमच्या मुलांनी काय नक्की व्हायला नको असं तुम्हाला वाटतं?’ ह्याचं उत्तर असं देतात - ‘आमची मुलं entitled (पाहिजे ते मिळणं हा तर माझा हक्कच) व्हायला नकोत.’ हे वाचून जरा बरं वाटलं का?
कारण ‘पाहिजे ते मिळणं हा तर माझा हक्कच’ असं वाटण्यात काहीतरी वावगं आहे असंच मुळातच मला वाटतच नसेल तर काय होतं; माझे वडील, त्यांचे वडील, आमच्या चार पिढ्या ‘पाहिजे ते मिळणं हा तर माझा हक्कच’ ह्या तत्त्वावरच लहानाच्या मोठ्या झाल्या असतील तर काय होतं; हे सध्या आपण जवळून पाहात आहोत. त्यातलं पाहिजे ते म्हणजे अक्षरशः पाहिजे ते आहे! अन्न, वस्त्र, निवारा, पैसा, गाड्या, प्रवास, अनुभव, प्रवेश, दारू, ड्रग्स, माणसं, पोलीस, डॅाक्टर, कायदा, राजकारणी, अगदी पाहिजे ते, वाट्टेल ते! त्यामुळं, माझ्या मुलामध्ये नक्की नसावा असा हा अवगुण आहे, हे मान्य असणारे बरेच पालक आहेत, हे समजल्यावर जरा हुश्श होतंय ना?
बेकी केनेडींकडे येणारे बऱ्यापैकी पालक अमेरिकी सुखवस्तू घरांमधले. खरंतर जेवढं जास्त सुखवस्तू घर तेवढी मुलं entitled होण्याची शक्यता जास्त असेल, नाही का? जास्त सुखवस्तू म्हणजे जास्त वस्तू! म्हणजे मुलांसाठी आपसूकच भरपूर गोष्टी घरात असतील, त्यांनी मागायच्या आतच अनेक गोष्टी मिळत असतील. मागितल्यावरही बरेचदा लगेचच मिळत असतील. अशी मुलं ‘पाहिजे ते मिळणं हा तर माझा हक्कच’ ह्या वाटेला जाणं जास्त शक्य असेल. अतिश्रीमंतांकडं तर अति शक्य असेल!
‘आमच्या लहानपणी अख्ख्या बिल्डिंगमध्ये एकांकडं टीव्ही आणि फोन होता. ह्यांना प्रत्येकी एक लॅपटॉप आणि फोन मिळालेत पण कदर नाही अजिबात!’ किंवा ‘कप विसळून ठेव म्हटलं तर नको नको होतं ह्यांना’ किंवा ‘मैत्रिणींकडे आहेत म्हणून दोन हजारांचे बॅडमिंटनचे बूट हवेत मझ्या सात वर्षांच्या मुलीला. परवडत असलं तरी असले खर्च करू नयेत असं वाटतं हो!’ अशा प्रकारची कळकळ व्यक्त करणाऱ्या पालकांना विचारात पाडायला बेकी म्हणतात-
चॉकलेटच्या ढिगाऱ्यात मुलाला वाढवायचं आणि चॉकलेटची कदर त्याला असावी ही अपेक्षाही ठेवायची, असं कसं चालेल! दैनंदिन घरकामं करायला नकार दिल्याबद्दल किंवा मुलाला हवी असलेली एखादी महागडी वस्तू ‘परवडत असूनही तत्व म्हणून घ्यायची नाही’ हे मुलावर ठसवण्यासाठी; आमच्या लहानपणी आम्ही तर अमुक तमुक करत असू किंवा तुझ्या वयाच्या हजारो मुलांना अमुक तमुक रोज करावंच लागतं; हा दोषारोप आणि लाज वाटवून देण्याचा खेळ करून ‘मी किती वाईट आहे’ असं मुलाला वाटवून द्यायचं आणि आपल्यापासून आणखीन तोडून टाकायचं, असं कसं चालेल! त्यापेक्षा, ‘पाहिजे ते मिळणं हा तर माझा हक्कच’ ह्या दिशेनं जायचं नसेल तर त्यासाठी कुठली कौशल्यं शिकवायला हवीत हा विचार करू.
हवी असलेली एखादी वस्तू न मिळणं सहन करता येणं, कंटाळवाणी कामं करता येणं आणि नको असलेली कामं करता येणं ही ह्याबाबतीतली तीन महत्वाची जीवनकौशल्यं आहेत. सुखवस्तू घरांमध्ये ही तीनही सहज वगळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं अशा पालकांनी ही कौशल्यं मुलांना येतील असे अनुभव अधून मधून आवर्जून देणं गरजेचं आहे.
माझ्या मुलानं ‘लहान बहिणीच्या बास्केटबॉल स्पर्धेला मी अजिबात येणार नाही!’ किंवा ‘कपड्यांच्या घड्या मी कशाला करू?!’ असलं काही म्हटलं की मी त्याला हे सांगत असल्याचं मला आठवतंय- डिशवॉशर मधली भांडी लावून ठेवणं, कपड्यांच्या घड्या करणं, स्वतःला हवा तसा निवांत वेळ घालवायचा सोडून लहान बहिणीच्या स्पर्धेला घरच्या सर्वांसोबत जाणं, सामान आणायला आईसोबत जाणं, वगैरे कामं कोणालाच आवडत नाहीत. पण आयुष्यात पुरेसा सभ्य/चांगला माणूस बनण्यासाठी बरीच नको वाटणारी कामं करावीच लागतात. त्यामुळं, माझ्यासोबत तू डिशवॉशरमधली भांडी जागेवर लावणार आहेस कारण तू पुरेसा सभ्य बनशील ह्याची खात्री मला करायची आहे आणि त्यासाठी तुझ्या गाठी कंटाळवाणी, नको असलेली कामं करायचे अनुभव असले पाहिजेत ह्याची खात्री मी केली पाहिजे.
पुरेसा सभ्य माणूस घडवणं हे मोठं समाजकार्य आहे. ते करण्याचा प्रयत्न करत राहणाऱ्या सर्वच पालकांना नमन!