Sunday, July 21, 2024

भरपाई

आजीच्या आठवणीतली पोहण्याची नदी,

बिनवासाची बिनरंगाची,

आम्ही दोन पिढ्यांत नासवली!


नळातून येऊ दिली भरभरून आत!

बेसिन, सिंक, संडास, ड्राय बाल्कनी, बाथरूम

सगळीकडून दिली सोडून बिनधास्त!


टूथपेस्टा, शॅंपू, साबण, डिटर्जंट, टॅायलेट क्लीनर,

आणखिन कसले कसले सोपस्कार

आणि फॅक्ट्र्यांची घाण!


आम्हाला पाणी देतं स्वच्छ धरण!

आमच्या आधी नाही कुठलं शहर!

आमची घाण आमच्याइथून ढकलल्याशी कारण!


पुढे असलेल्या गावांचा,

त्या लोकांच्या स्वास्थ्याचा,

विचारही जाऊ दिला वाहून!


त्या पुढच्या गावांमध्ये

आहेत ना शेतकरी,

भाज्या फळं पिकवणारे, मासे पाळणारे…


त्यांची बाजारपेठ म्हणजे आमचंच शहर!

खातो आमचीच नदी आम्ही,

मेडिकल इन्शुरन्स आहेच स्वादानुसार!


आम्ही शिकत नाही धडा तरी 

आपोआप पापं पोटात गेली,

याची देही याची डोळा नुकसान भरपाई!

Tuesday, June 18, 2024

The Porsche incident

गरीब-श्रीमंत, लहान-थोर, शिक्षित-अशिक्षित, बाया-पुरुष सगळ्यांना रस्त्याचा वापर तर करावाच लागतो! त्यामुळं बेधुंद होईतो नशा करून मग बेलगाम गाडी चालवणाऱ्या मुलांपासून धोका ह्या सगळ्यांनाच आहे. आज माझ्या मुलानं असं वागून इतर कोणाला धडक देऊन मारलं, तसं दुसऱ्याचं मूल उद्या माझ्या मुलाला उडवू शकतंच. माझं मूल मित्र म्हणून अशा कोणाच्या गाडीत बसलेलं असलं तरी त्या झिंगाट मुलानं केलेल्या अपघातात दगावू शकतंच. भारतीय दंड संहितेचं कलम ३०४ लागू करण्याची शक्यता वाढवणं भयानकच! अशी मुलं असलेल्या समाजाचं स्वास्थ्य किती बेताचं असेल, विचार करा! रस्त्यावर असताना कायम झिंगाट बेपर्वा मुलांची भीती बाळगत वावरावं लागेल. त्यामुळं माझंही मूल असं व्हायला नको आणि तुझंही मूल असं व्हायला नको. प्रत्येकानंच आपलं मूल असं होऊ न देण्यासाठी प्रयत्न करणं हे सगळ्या समाजाच्याच दैनंदिन सुरक्षिततेसाठी गरजेचं आहे. माणसं मारू शकतील अशी यंत्र ज्यांच्या घरी सहज उपलब्ध आहेत इतपत श्रीमंतांनी तर ही काळजी घेणं जास्तच गरजेचं! 

 पण म्हणजे करायचं काय? 

 डॉक्टर बेकी केनेडी म्हणून एक अमेरिकी मानसशास्त्रज्ञ आहेत. पालकांच्या विविध समस्यांचा त्यांनी भरपूर अभ्यास केला आहे. एका युट्युब पॉडकास्टमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे येणारे ९५ टक्के पालक, ‘तुमच्या मुलांनी काय नक्की व्हायला नको असं तुम्हाला वाटतं?’ ह्याचं उत्तर असं देतात - ‘आमची मुलं entitled (पाहिजे ते मिळणं हा तर माझा हक्कच) व्हायला नकोत.’ हे वाचून जरा बरं वाटलं का? 

 कारण ‘पाहिजे ते मिळणं हा तर माझा हक्कच’ असं वाटण्यात काहीतरी वावगं आहे असंच मुळातच मला वाटतच नसेल तर काय होतं; माझे वडील, त्यांचे वडील, आमच्या चार पिढ्या ‘पाहिजे ते मिळणं हा तर माझा हक्कच’ ह्या तत्त्वावरच लहानाच्या मोठ्या झाल्या असतील तर काय होतं; हे सध्या आपण जवळून पाहात आहोत. त्यातलं पाहिजे ते म्हणजे अक्षरशः पाहिजे ते आहे! अन्न, वस्त्र, निवारा, पैसा, गाड्या, प्रवास, अनुभव, प्रवेश, दारू, ड्रग्स, माणसं, पोलीस, डॅाक्टर, कायदा, राजकारणी, अगदी पाहिजे ते, वाट्टेल ते! त्यामुळं, माझ्या मुलामध्ये नक्की नसावा असा हा अवगुण आहे, हे मान्य असणारे बरेच पालक आहेत, हे समजल्यावर जरा हुश्श होतंय ना? 

 बेकी केनेडींकडे येणारे बऱ्यापैकी पालक अमेरिकी सुखवस्तू घरांमधले. खरंतर जेवढं जास्त सुखवस्तू घर तेवढी मुलं entitled होण्याची शक्यता जास्त असेल, नाही का? जास्त सुखवस्तू म्हणजे जास्त वस्तू! म्हणजे मुलांसाठी आपसूकच भरपूर गोष्टी घरात असतील, त्यांनी मागायच्या आतच अनेक गोष्टी मिळत असतील. मागितल्यावरही बरेचदा लगेचच मिळत असतील. अशी मुलं ‘पाहिजे ते मिळणं हा तर माझा हक्कच’ ह्या वाटेला जाणं जास्त शक्य असेल. अतिश्रीमंतांकडं तर अति शक्य असेल! 

 ‘आमच्या लहानपणी अख्ख्या बिल्डिंगमध्ये एकांकडं टीव्ही आणि फोन होता. ह्यांना प्रत्येकी एक लॅपटॉप आणि फोन मिळालेत पण कदर नाही अजिबात!’ किंवा ‘कप विसळून ठेव म्हटलं तर नको नको होतं ह्यांना’ किंवा ‘मैत्रिणींकडे आहेत म्हणून दोन हजारांचे बॅडमिंटनचे बूट हवेत मझ्या सात वर्षांच्या मुलीला. परवडत असलं तरी असले खर्च करू नयेत असं वाटतं हो!’ अशा प्रकारची कळकळ व्यक्त करणाऱ्या पालकांना विचारात पाडायला बेकी म्हणतात- 

 चॉकलेटच्या ढिगाऱ्यात मुलाला वाढवायचं आणि चॉकलेटची कदर त्याला असावी ही अपेक्षाही ठेवायची, असं कसं चालेल! दैनंदिन घरकामं करायला नकार दिल्याबद्दल किंवा मुलाला हवी असलेली एखादी महागडी वस्तू ‘परवडत असूनही तत्व म्हणून घ्यायची नाही’ हे मुलावर ठसवण्यासाठी; आमच्या लहानपणी आम्ही तर अमुक तमुक करत असू किंवा तुझ्या वयाच्या हजारो मुलांना अमुक तमुक रोज करावंच लागतं; हा दोषारोप आणि लाज वाटवून देण्याचा खेळ करून ‘मी किती वाईट आहे’ असं मुलाला वाटवून द्यायचं आणि आपल्यापासून आणखीन तोडून टाकायचं, असं कसं चालेल! त्यापेक्षा, ‘पाहिजे ते मिळणं हा तर माझा हक्कच’ ह्या दिशेनं जायचं नसेल तर त्यासाठी कुठली कौशल्यं शिकवायला हवीत हा विचार करू. 
हवी असलेली एखादी वस्तू न मिळणं सहन करता येणं, कंटाळवाणी कामं करता येणं आणि नको असलेली कामं करता येणं ही ह्याबाबतीतली तीन महत्वाची जीवनकौशल्यं आहेत. सुखवस्तू घरांमध्ये ही तीनही सहज वगळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं अशा पालकांनी ही कौशल्यं मुलांना येतील असे अनुभव अधून मधून आवर्जून देणं गरजेचं आहे. 
माझ्या मुलानं ‘लहान बहिणीच्या बास्केटबॉल स्पर्धेला मी अजिबात येणार नाही!’ किंवा ‘कपड्यांच्या घड्या मी कशाला करू?!’ असलं काही म्हटलं की मी त्याला हे सांगत असल्याचं मला आठवतंय- डिशवॉशर मधली भांडी लावून ठेवणं, कपड्यांच्या घड्या करणं, स्वतःला हवा तसा निवांत वेळ घालवायचा सोडून लहान बहिणीच्या स्पर्धेला घरच्या सर्वांसोबत जाणं, सामान आणायला आईसोबत जाणं, वगैरे कामं कोणालाच आवडत नाहीत. पण आयुष्यात पुरेसा सभ्य/चांगला माणूस बनण्यासाठी बरीच नको वाटणारी कामं करावीच लागतात. त्यामुळं, माझ्यासोबत तू डिशवॉशरमधली भांडी जागेवर लावणार आहेस कारण तू पुरेसा सभ्य बनशील ह्याची खात्री मला करायची आहे आणि त्यासाठी तुझ्या गाठी कंटाळवाणी, नको असलेली कामं करायचे अनुभव असले पाहिजेत ह्याची खात्री मी केली पाहिजे. 


 पुरेसा सभ्य माणूस घडवणं हे मोठं समाजकार्य आहे. ते करण्याचा प्रयत्न करत राहणाऱ्या सर्वच पालकांना नमन!

Wednesday, October 18, 2023

लहान्याला समजलं

लहान्या शाळेतून घरी चालला होता. हौदापर्यंत पोचला आणि गम्मतच दिसली त्याला!

 बैलच बैल! मस्त रगडून अंघोळ घालणं सुरु होतं बैलांना. लहान्याला एकदम आठवलं! शाळेत पहिल्या तासाला तो मोठ्या आकाराचा माणूस ‘शेतकरी बैलात पोळा तत्व’, की ‘शेतकरी पोळ्यात बैलत्व’, की असलंच कसलंतरी काहीतरी समोरच्या खुर्चीवरून मोठ्याने बोलत होता. ‘बैलपोळा उद्या!’ लहान्याला समजलं. 

त्याचा बापण मालकाचे बैल धूत होता. लहान्या समोरच्या पारावर चिंचेला टेकून बसला. एक बैल जरा दंगा करत होता. एक मागे शांत बसला होता. चार-पाच बैल हौदाच्या एकदम जवळ पाण्याची मजा घेतल्यासारखे अंघोळ घालून घेत होते. लहान्याचा बा धूत होता तो बैल पोटाजवळ पायाशी घासायला गेलं की पाय उचलून नाच करत होता. ‘काखेत गुदगुल्या!’ लहान्याला समजलं. 

आपल्याकडेही पाहिजे होते पाच-सहा बैल, असं काहीसं मनात येत असताना लहान्या चिंचेच्या खोडाशी स्वतःची पाठ जुळवून घ्यायला लागला. पाच-सहा जरा जास्तच होताहेत, एकतरी बैल पाहिजे होता, अशी तडजोड मनाशी करत त्यानं पाठ खोडात मस्तपैकी बसवली. डोकं मागं टेकता टेकता त्यात शंका आली, ‘पाच-सहा म्हणजे पाच-सहा असतात, एक म्हणजे एक असतो, हे मला समजलंय हे शाळेतल्या समोरच्या खुर्चीतल्या मोठ्या आकाराच्या माणसाला समजलंय की नाही?’ 

ह्या पुढेही विचार येतच होते पण तेवढ्यात दोन बैल त्याच्या दिशेनं यायला लागले! तो बघतच राहिला! 

त्यांनी त्याला हौदावर नेऊन घासून अंघोळच घातली! त्यालाही काखेत गुदगुल्या झाल्या. तो काय काय सांगत होता त्या बैलांना पण त्यांना ते समजत नव्हतं. शाळेतल्या समोरच्या खुर्चीतल्या मोठ्या आकाराच्या माणसासारखेच वाटले त्याला ते.

त्यांच्या पुढच्या दोन पायांचे मधेच हात होत होते, मधेच पाय. त्यांनी लहान्याला वाळू दिलं. थंडीच वाजली त्याला जरा तेव्हा. तो त्यांना तसं सांगत होता पण त्यांना ते समजत नव्हतं. शाळेतल्या समोरच्या खुर्चीची आठवण लहान्याला होणार इतक्यात त्यांच्या पुढच्या पायांचे हात झाले! 

त्यांनी लहान्याचा भांग पडला. मधोमध. केसांचे झालेले दोन भाग त्यांनी चक्क झेंड्याच्या रंगात रंगवले. दोन झेंडे! आणखीन त्यावर त्यांनी लावले दोन गोंडे! ‘मला झेंडे-गोंडे असे शब्द येतात हे शाळेतल्या समोरच्या खुर्चीतल्या मोठ्या आकाराच्या माणसाला येतं की नाही?’ अशी शंका लहान्याला तिथेही येऊन गेली. 

तेवढ्यात बैलांच्या हातांचे पाय झाले, ते चालत एका घरात गेले आणि एक पिवळं चमचमतं, छोट्या चादरीच्या आकाराचं कापड तोंडात धरून घेऊन आले. त्या कापडावर बरोबर मध्यात पताकांच्या आकाराचे निळे तुकडे चिकटवले होते. मुली नाचायला फेर धरून गोलात उभ्या राहतात तसे लावले होते ते. हे कापड बघता बघता लहान्याच्या डोक्यात शंका आली, ‘मला हे सगळे आकार माहीतेत हे शाळेतल्या समोरच्या खुर्चीतल्या मोठ्या आकाराच्या माणसाला माहीतेय की नाही?’

 बैलांनी लगेचच ही शंका चमचमत्या कापडानं झाकून टाकली. लहान्या जरा वैतागलाच. ते परत जाऊन प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा घेऊन येत होते. पण चड्डीचं काय?! लहान्या ओरडणारच होता पण त्याला आठवलं की त्यांना काही समजत नाही, शाळेतल्या समोरच्या खुर्चीतल्या … 

बैलांच्यात पहिलीतल्या मुलांना चड्डी घालत नसतील, लहान्यानं स्वतःला समजावलं. तोवर त्याच्या गळ्यात प्लास्टिकफुलांच्या माळा आणि पायात घुंगरू आले होते. आता बैलांच्या पायाचे हात आणि हाताचे पाय भरभर अदलाबदली करत होते. लहान्याच्या कपाळावर, पाठीवर गुलालाने चित्र काढली जात होती, मधून मधून काहीतरी खायला घातलं जात होतं, आजूबाजूला आणखीन बैल गोळा होत होते, … 

तिघा बैलांनी लहान्याजवळ मागच्या पायांवर उभं राहून पुढच्या हातांनी एक ढोल आणि दोन ताशे वाजवायला सुरुवात केली तेव्हा मात्र लहान्याला गरगरायला लागलं. त्यानं तिथून निघून जायचा प्रयत्न केला तेव्हा काही बैलांनी त्याला चिंचेच्या झाडाला दोरानं बांधून ठेवलंय हे त्याच्या लक्षात आलं. त्याला पुन्हा शाळेतली समोरची खुर्ची आठवली! बाकी मुलं कुठं दिसतात का ते शोधू लागला मग तो! 

तेवढ्यात ते आधीचे दोन बैल आरशांचे अनेक तुकडे लावलेलं काहीतरी घेऊन आले आणि थेट लहान्याच्या तोंडावरच बांधलं! दोन डोळे आणि एक नाकासाठी तीन भोकं होती फक्त! बाकी बंद सगळीकडून! दोन भोकातून थोडं थोडं बाहेरचं जग बघताना लहान्याच्या डोक्यात शंका आली, आपल्याला तरी हे दिसताहेत थोडे, पण हे आपल्याकडे आले तरी ह्यांना हेच दिसतील आरशात! हे आपल्याला समजून घेऊच शकणार नाहीत आता, अशी खात्री पटली लहान्याला. शाळेतल्या समोरच्या खुर्चीतल्या मोठ्या आकाराच्या माणसाबद्दल एवढं खात्रीलायक नाही सांगता आलं त्याला. त्या गोंधळातही जरा बरं वाटलं त्यामुळे त्याला. 

गोंधळ वाढत होता, आता लहान्याला गावातल्या मोठ्या घरांवरून हिंडवायला सुरुवात झाली. ढोल, ताशे आणि अनेक बैल नाचत गात, गुलाल उडवत त्याला नेत होते. गोंगाटात इतर मुलांनाही नेत आहेत असं मधेच त्याला वाटून गेलं. घरासमोर त्याला उभं केलं की घरातून बैल बाहेर येऊन त्याची गुलाल लावून पूजा करून, त्याला खायला घालून, त्याच्या शेजारच्या बैलाला पैसे देत होते. बैलांना पैशाचं काय, मला दिले तर मी पाणीपुरी खाईन, लाईट वाली पेन्सिल घेईन, … डोक्यात हिशोब लावता लावता त्याला शंका आली, मला हिशोब येतो हे शाळेतल्या समोरच्या खुर्चीतल्या … 

… गोंगाटामुळे शंका पूर्ण झाली नाही. त्याला खूप तहान लागली होती पण सगळे खायलाच देत होते, कोणी पाणी नव्हतं देत. तहान, ढोल, ताशे, नाच, गाणी, … असह्य झालं त्याला सगळं! अंगातली सगळी शक्ती एकत्र करून आता जोरात बोंबलावं आणि थयथयाट करावा असं ठरवून त्यानं जोरात छाती भरून श्वास घेतला आणि बोंबलणार तेवढ्यात … 

… तेवढ्यात त्याचे डोळे उघडले! 

समोर हौदावर मस्त रगडून अंघोळ घालणं सुरु होतं बैलांना! 

इतकं हुश्श कधीच झालं नव्हतं लहान्याला! माझ्याकडे एकही बैल नाही हेच बरंय, नाहीतर मीपण त्याला असं वागवलं असतं! लहान्याला समजलं! 

पण मला हे समजलंय हे शाळेतल्या समोरच्या खुर्चीतल्या … 

छे! शंका येऊ न देताच त्यानं खोडात पसरलेली पाठ बाहेर काढून स्वतःला उभं केलं आणि घराकडे पळाला. 

Thursday, October 5, 2023

अमोल, अनू, अत्तू, अडबड असे चौघं गेले अमळनेरला. ‌अमळनेरला अडबडला अलगच फळ दिसलं. अडबड लागला गडबड करायला. “अरे अमोल, अगं अनू, अरे अत्तू, हे बघा अलगच फळ, अलगच फळ, अलगच फळ!” 

“असं काय! बघू बघू…?” अमोल, अत्तू. 

“अलगच फळ!” अमोल. 

“अरे होना!” अत्तू. 

“अगं बघ ना!” अडबड. 

“अरे नाव असेल की काहीतरी ह्याचं!” अनू. 

“असेल असेल” अत्तू. 

“विचार नं त्यांना!” अमोल. 

“अरे दादा, ह्याचं नाव काय?” अडबड. 

“अननस” दादा. 

“अननस??!!” अत्तू. 

“अरे बापरे! अननस?! असं नाव असतं?!” अडबड. 

“अननस असं असतंय होय!!!” अनू. 

“अलगच असतंय!” अमोल. 

“पहली बार देखा?! रुको! अपुन काटके देता टेस्ट करो बच्चो थोडा थोडा.” दादा. 


-तुम्ही खरं अननस दाखवून गोष्ट सांगा आणि मग कापून खाऊन टाका! 😍

गोष्टीत फक्त ‘अ’ आहे. ‘आ’ वगैरे काही मुद्दाम वापरलं नाहीये. गोष्ट कितीही वाढवू शकता हे लक्षात आलं असेलच तुमच्या. 😊



मुलांच्या भावविश्वातले-

असं

अलग

अगर

अगरबत्ती

अहिरणी

अख्खा

अर्धा

अमर

अजगर

अनुक्रमणिका (शाळेत खूपदा ऐकत असतील)

असर

अक्कल

अमूल (कंपनी)

अवघड

अरे

अरेरे

अती

अच्छा

अब्बा

अम्मी

अप्पा

अडकला

अटकन

अजूबा (जादूवाला बोलत होता त्या दिवशी हा शब्द)

अगं

अय्या

अत्तर

अढी

अफवा

अर्थ

अठ्ठी

अण्णा

असेल, असू दे

अळी

अशी

अवयव

अल्ला

अक्षर


मुलांच्या भावविश्वात नसलेले पण तरी कधीतरी वापरायला-

अव्वल

अगदी

अछूट

अखेर

अन्य

अग्नी

अन्याय

अटल

अलगद

अनुभव

अरण्य

अचल 

अमल

अदब

अभय

अतिरेक

अनुक्रम

अष्ट

अगणित


मुलांची आणि गावांची नावं तर काहीही ठेवू शकतोच-

अमोल अनु अवी अनिश अविनाश अनामिका अनघा अलका अप्पू अनिता अरबाज अली अझहर अमळनेर अल्फिया अमरपूर अलिगढ …

Friday, September 29, 2023

PoCRA


शेतकरीदादा तुला काय पाहिजे??

राजम्याला चार बार पाणी पाहिजे!


शेतकरीदादा पाणी येणार कुठून?!

जमिनीतून बाबा जमिनीतून!

शेतकरीदादा जमिनीत पाणी किती??

ते कसं सांगू बाबा नाही माहिती!

शेतकरीदादा आधी पाऊस मोजू,

मग तुझ्या गावातली माती बघू,

मातीत मुरेल ते रबीत उरेल,

तुला पुरेल की त्याला पुरेल??


शेतकरीदादा तुला काय पाहिजे??

राजम्याला चार बार पाणी पाहिजे!


शेतकरीदादा पाणी किती आहे रे?

पवसाचं मुरलंय तितकं रे!

शेतकरीदादा पाणी तुझं आहे का?

माझं त हाय… पण त्याचंबी हाय…

कुणाचं किती रे कुणाचं किती?

ते कसं सांगू बाबा नाही माहिती!

शेतकरीदादा तुला नीटच कळेल,

तुला मिळेल अन त्यालाबी मिळेल! 

सर्वांना पुरलं तर पाहीजे ना,

मग थोडं गणित शिकून घे ना!

आशा संपतेय

नाचवा ह्यांना चोवीस तास

पोचवा मंडळांना भरपूर निधी

मानवा कर्कशतेत सार्थकता

फिरवा गरगर लखलख

पटवा हाच तो आनंद

जगतील मग ते दहा दिवस अन् चोवीस तास
आवाजाने
झगमगत

बघतील मग त्यांच्या खऱ्या गरजांकडे
बधीरतेने
डोळे दिपून

Monday, September 18, 2023

अख्खाच्या अख्खा (घग्या - २)

एक असतो घग्या. त्याची बायको घगी. त्यांचा मुलगा घगल्या आणि मुलगी घगली. सगळे मिळून शेतात मुळा लावतात. लांबच्या लांब मुळे जमिनीखाली तयार होतात. 

एक दिवस घगल्या-घगली शाळेला जायला निघतात तेवढ्यात मागून आईची हाक येते. 

“घगल्या! घगली!” 

दोघं वळून बघतात तर आई शेताच्या दिशेनं बघत असते. शेताकडून बाबा घाईनं घराकडं येत असतो. घगली बघते- बाबाच्या हातात लांब मुळा! सगळे एकमेकांजवळ पोचल्यावर घग्या म्हणतो, “एवढे मोठे मुळे आलेत, एक न्या की शाळेत. द्या की टीचरला.” 

घगल्या खुश! शाळेत शायनिंग! तो पटकन दप्तर पाठीवरून काढून उघडतो, मुळा भरायला. त्याची घाई बघून घग्या बजावतो, “हळू! अख्खाच्या अख्खा दे मुळा टीचरला! तोडू नको! घाई नको!” 

मग सगळे मिळून अलगद मुळा दप्तरात ठेवतात. तिरका. देठाचा भाग आत. वह्या पुस्तकं पुढे मागे करून. निमुळता भाग दप्तराच्या वरच्या एका कडेनं थोडा बाहेर काढून. मग घग्या दप्तर उचलून धरतो आणि घगल्या हळूच दोन्ही हात पट्ट्यांत सरकवून दप्तर पाठीवर घेतो. 

“नीट जा काय!” घगी म्हणते आणि पोरं शाळेकडं निघतात. 

निघतात म्हणजे निघतातच! मुळा तुटू नये म्हणून घगल्या ताठच्या ताठ चालतो आणि घगली नेहमीच्या टवाळ्या करत ‘घगल्या चड्डीत शी झाल्यासारखा चालतोय’ म्हणून स्वतःशीच हसते! घगली झाडावरच्या चिंचा बघते, रस्त्याकाठचा कचरा बघते, समोरच्या घरातलं वाळवण बघते, मागून येणारा मुळा-रक्षक सैनिक बघते… घगल्या नुसते डोळे फिरवून दिसतंय तेवढंच बघत नाकासमोर सरळसोट चालतो. त्यानं मान वळवली तरी चालणारे हे कळतं त्याला, पण वळत नाही! 

अचानक डोळ्याच्या उजव्या खालच्या कोपऱ्यातून त्याला एक खूपच बुटकी घगली पाहिल्याचा भास होतो! आपल्या परेडचा अबाउट टर्न करून तो नीट बघतो तर घगली रस्त्याकाठच्या कचऱ्यात काहीतरी बघत खालीच बसलेली! 

“घगल्या बघ ना! चिकटपट्टी! अर्धी तशीच आहे! कोणीतरी अर्धी चांगली फेकून दिली! घेऊया का?” 

“नाही! चल!” घगल्या ताठ मानेनं नकार देतो. 

“अरे फेकूनच दिलीये ती! फेकूनच राहणार ती इथे! आपण तिला घरी न्यू! छान ठ्यू!” म्हणत ती चिकटपट्टी चटकन दप्तरात टाकते आणि घगल्याच्या अबाउट टर्नचा अबाउट टर्न होईतो उड्या मारत त्याला ओलांडून पुढं निघते. 

दोघं शाळेत पोचतात तर चिंचेच्या झाडाखाली सगळी पोरं जमून वर बघत एकच कालवा करत असतात. दोघं धावत वर्गात दप्तरं टाकून पोरांच्या गर्दीत घुसतात. 

झाडावर चार माकडं! त्यामुळे झाडाखालच्या चाळीस वंशजांचा नुसता धुडगूस! शेवटी टीचरच्या टाळ्या ऐकू यायला लागतात तेव्हा पोरं भानावर येतात. घगल्या-घगली तर चौपट भानावर येतात! 

मुळा! अख्खा! मघाशी घाईत वर्गात दप्तर फेकलं! 

पुन्हा दोघं धावत वर्गात! घगल्या घाबरत दप्तर उघडतो. मुळ्याचे दोन तुकडे! तो बघतच राहतो नुसता! घगलीपण गप्प एकदम. पण तिच्या डोळ्यातून पाणी येणार तेवढ्यात डोक्यातून आयडिया येते! घगल्याला धरून गदागदा हलवत ती ओरडतेच! 

“चिकटपट्टी!” 

घगल्यापण मग रडायऐवजी हसायलाच लागतो! 

घगली चिकटपट्टी दप्तरातून काढेपर्यंत तो दोन्ही तुकडे बरोब्बर जुळवून मुळा धरून बसतो. इतकं बरोब्बर जुळवून की चिकटपट्टीच्या सुरुवातीसारखीच मुळ्यावरची तुटलेली चीर सापडतच नाही घगलीला पटकन! चिकटपट्टीचं टोक मुळ्यावर चिकटवून, घगल्याच्या दोन्ही हातांच्या मधून पुन्हा पुन्हा चिकटपट्टीच्या गोल गोल गटांगळ्या मारत घगली मुळा गच्च चिकटवते. दोघं पुन्हा धावत बाहेर जातात, टीचरला शोधतात आणि मुळा देतात. 

अख्खाच्या अख्खा!

 

 —------------------------------------------------------------------------------------------------------------------------ (वस्तीवरच्या एका वर्गात एका दादानं घग्याची गोष्ट मुलांना सांगितली. त्या मजेदार गोष्टीत घग्या, घगी, घगल्या आणि घगली शेतात मुळा कसा लावतात, मग लांबच्या लांब मुळे जमिनीतून ओढून कसे बाहेर काढतात आणि मग ते कसे खातात असं सगळं वर्णन आहे. त्या गोष्टीचा लेखक माहीत नाही. पण त्या अनामिकाला सलाम! आणि गोष्ट सांगणाऱ्या दादालाही सलाम! कारण ती गोष्ट ऐकून दुसऱ्याच दिवशी सुचली ही घग्या-भाग-२!) —------------------------------------------------------------------------------------------------------------------------ 

 

खाली गोष्टीची कविता दिली आहे. मुलांना ही गोष्ट सांगताना, जसजशी गोष्ट पुढे जाते तसतसं पुढच्या पुढच्या ओळी म्हणायला खूप आवडतं! त्यांच्या आवडीनुसार गोष्ट/कविता बदलून म्हणू शकतो! 

 

दप्तरात ठेवले मुळ्याला, 

मुळा द्यायचा टीचरला, 

घगल्या चालला शाळेला, 

घगलीबी चालली शाळेला… 

 

रस्त्यात भेटली चिकटपट्टीला, 

दप्तरात टाकली चिकटपट्टीला, 

घगल्या पोचला शाळेला, 

घगलीबी पोचली शाळेला… 

 

माकडं लागली चिंचेला, 

वर्गात टाकून दप्तरला, 

घगल्या माकडं बघायला, 

घगलीबी माकडं बघायला… 

 

पाहिले जेव्हा टीचरला, 

एकदम मुळा आठवला, 

पण दप्तर उघडून बघतो तर… 

मुळा होता तुटलेला! 

 

घगलीला आली आयडिया! 

दप्तरातून काढली चिकटपट्टीला, 

चिकटून दिली मुळ्याला, 

मुळा दिला टीचरला!